चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोनचा भीषण स्फोट, ४ मुलांचा होरपळून मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th March, 04:49 pm
चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोनचा भीषण स्फोट, ४ मुलांचा होरपळून मृत्यू

मेरठ : मोदीपुरम परिसरात शनिवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली. दरम्यान खोलीत उपस्थित लोकांना स्वतःला वाचण्याची संधीच मिळाली नाही. यात कुटुंबातील सहा जण गंभीररीत्या भाजले. यातील ४ मुलांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचबरोबर मुलांच्या पालकांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 मोबाईल फोन चार्जिंगला लावला असता यावेळी चार्जरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने मोबाईलचा स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे पलंग आणि पडद्यांना लगेच आगीने वेढले. काही वेळातच आग संपूर्ण खोलीत पसरली. खोलीत उपस्थित चारही मुले आगीत सापडली. मुलांना वाचवताना पालकही भाजले. आग इतकी भीषण होती की कोणालाही बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

पहाटे २  ते ४  च्या दरम्यान झाला मृत्यू 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये कल्लू (५ ), गोलू (६), निहारिका (८) आणि सारिका (१२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे वडील जॉनी मेडिकल कॉलेजमध्ये तर आई बबिता एम्समध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. रात्री २  वाजता मुलगी निहारिका आणि मुलगा गोलू यांचा मृत्यू झाला. मोठी बहीण सारिकाचा पहाटे ४ वाजता तर धाकटा मुलगा कल्लूचा सकाळी १० वाजता मृत्यू झाला. सर्वांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते.

मुले मोबाईलवर गेम खेळत होती

अधिकाऱ्याने सांगितले की, जॉनीची प्रकृती धोक्याबाहेर आहे, मात्र बबिताची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. जॉनीने सांगितले की, निहारिका, गोलू आणि कालू मोबाईलवर गेम खेळत होते आणि यादरम्यान मोबाईल चार्जही होत होता. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले.


हेही वाचा